By, Avishkar Fule
केसनंद, ता. ७ : आळंदी–मरकळ मार्गावरील तुळापूर परिसरातील नदीकाठावरील एका खासगी फार्म हाऊसमध्ये सुरू असलेल्या ‘प्रोजेक्ट एक्स’ हाऊस पार्टीवर पुणे गुन्हे शाखेने रविवारी पहाटे धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत १०० हून अधिक तरुण-तरुणींची चौकशी करण्यात आली असून अल्प प्रमाणात गांजा, प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स, हुक्का साहित्य तसेच मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांना तुळापूर परिसरात एका फार्म हाऊसमध्ये अनधिकृतरीत्या पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष पथकाने छापा टाकला. कारवाईदरम्यान गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस आयुक्त तेजस्विनी सातपुते, उपायुक्त गोहर हसन, सहाय्यक आयुक्त शंकर खटके तसेच लोणीकंद पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

प्राथमिक तपासात पार्टीसाठी घेतलेला मद्यविक्री व मद्यसेवन परवाना ६ जून रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंतच वैध असल्याचे समोर आले आहे. त्यानंतरही पार्टी सुरू ठेवण्यात आली होती का, तसेच परवान्याच्या अटींचे उल्लंघन झाले आहे का, याची चौकशी सुरू आहे. उपस्थितांपैकी काहींचे वय २१ वर्षांपेक्षा कमी असल्याची माहितीही पुढे आली असून त्याची पडताळणी केली जात आहे.
छाप्यात तीन हुक्का पॉट, दहा प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स, अल्प प्रमाणातील गांजा आणि लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. कार्यक्रमस्थळी अमली पदार्थांचा वापर झाला होता का, याचीही तपासणी सुरू असून अधिकृत अहवालानंतर पुढील गुन्हे दाखल करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
सदर फार्म हाऊस एका डॉक्टरांच्या मालकीचे असल्याची माहिती समोर आली असून जागा अधिकृतरीत्या भाडेतत्त्वावर देण्यात आली होती का, याचाही तपास सुरू आहे. ग्रामपंचायत नोंदी आणि बांधकाम परवानग्यांचीही पडताळणी केली जात आहे.
दारूच्या बाटल्यांचा खच, डीजे आणि पार्टी लॉन
नदीकिनारी झाडीच्या आड असलेल्या या फार्म हाऊसमध्ये प्रशस्त पार्टी लॉन, डीजे लाइटिंग आणि बैठकीची व्यवस्था करण्यात आली होती. प्रवेशद्वारावर ‘प्रोजेक्ट एक्स हाऊस पार्टी’ असा मोठा फलक लावण्यात आला होता. परिसरात मोठ्या प्रमाणावर मद्याच्या बाटल्या आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांचा कठोर इशारा
“पार्टी आयोजक, सहभागी व्यक्ती आणि विविध नियमांचे उल्लंघन याबाबत सखोल तपास सुरू आहे. दोषींवर संबंधित कायद्यांनुसार कठोर कारवाई केली जाईल. अशा प्रकारच्या घटनांवर पोलिसांचे बारकाईने लक्ष असून भविष्यातही अशाच कारवाया सुरू राहतील,” असे अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) तेजस्विनी सातपुते यांनी सांगितले.
ग्रामस्थांचा निषेध
धर्मवीर छत्रपती संभाजीराजांच्या बलिदानभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळापूर परिसरात अशा प्रकारच्या पार्ट्या होणे निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी माजी सरपंच ज्ञानेश्वर शिवले, माजी उपसरपंच गणेश पुजारी तसेच अन्य ग्रामस्थांनी केली आहे.








