By, Suraj Jagtap
केडगाव, ता. दौंड (प्रतिनिधी) : केडगाव येथील बेकायदा गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरण राज्यभर गाजत असताना यवत पोलिस ठाण्यात आज आणखी दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची माहिती पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज यांनी दिली.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गुजर यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार डॉ. स्वाती लवंगारे (रा. केडगाव) आणि डॉ. तुकाराम मोटे (रा. उरुळी कांचन) यांच्याविरोधात महिलांना बेकायदेशीरपणे गर्भपाताच्या गोळ्या दिल्याप्रकरणी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. स्वाती लवंगारे यांचे केडगाव येथे लवंगारे मॅटरनिटी होम या नावाने रुग्णालय असून डॉ. तुकाराम मोटे यांचे उरुळी कांचन येथे माहेर हॉस्पिटल आहे.
केडगाव येथील गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. तसेच विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संबंधितांवर मोक्का लावण्याबाबत नुकतेच वक्तव्य केले आहे. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला अधिक वेग आला आहे.
यवत पोलिस ठाण्याने यापूर्वी या प्रकरणाचा तपास केला असून, पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दोन दिवसांपूर्वी हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ एम्पल्ले यांच्या आदेशानुसार गेल्या दोन दिवसांपासून दौंड तालुक्यातील विविध रुग्णालयांची आरोग्य विभागाच्या भरारी पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. या तपासादरम्यान लवंगारे मॅटरनिटी होममध्ये गर्भपाताच्या गोळ्या आढळून आल्या. गर्भपाताच्या गोळ्या देण्याचा अधिकार नसताना डॉ. लवंगारे आणि डॉ. मोटे यांनी बेकायदेशीरपणे या गोळ्यांचा वापर केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले.
केडगाव येथील गर्भलिंग निदान रॅकेटचा भांडाफोड २० मे रोजी झाला होता. त्यानंतर या प्रकरणात तीन डॉक्टरांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज डॉ. मोटे आणि डॉ. लवंगारे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून, डॉ. तुकाराम मोटे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणात यापूर्वी गुन्हा दाखल झालेले डॉ. मंदार माळी (रा. किकवी, ता. भोर) आणि डॉ. सुंदरम कदम (रा. उरुळी कांचन) हे दोन्ही डॉक्टर अद्याप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.








