By, सुरज जगताप
शिरूर, ता. १३ : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या फायरिंग प्रकरणातील दोन मुख्य फरार सराईत आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सातारा जिल्ह्यातून अटक केली आहे. आरोपींकडून दोन गावठी पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
मांडवगण फराटा येथील भैरवनाथ क्रिकेट मैदानावर १९ मार्च २०२६ रोजी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेसाठी लावलेल्या बॅनरवर फोटो न लावल्याच्या कारणावरून दोन गुन्हेगारी टोळ्यांमध्ये वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर थेट फायरिंगमध्ये झाले. दोन्ही गटांनी एकमेकांवर गोळीबार करत खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप असून याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या गुन्ह्याच्या तपासात यापूर्वी पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूलही जप्त करण्यात आले होते. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय उर्फ ईश्वर गोविंदा पाटील (वय ३१) आणि सत्यम उर्फ पप्पू दत्तात्रय कड (वय २६) हे घटनेपासून फरार होते.
पोलीस तपासात अक्षय पाटील याच्याविरुद्ध मारामारी, खुनाचा प्रयत्न, अवैध शस्त्र बाळगणे यांसह गंभीर स्वरूपाचे १८ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर २०२३ मध्ये एमपीडीए अंतर्गत कारवाईही करण्यात आली होती. तर सत्यम उर्फ पप्पू कड याच्यावर खून, मारामारी आणि आर्म ॲक्टसह १२ गंभीर गुन्हे दाखल असून तो चाकण पोलीस ठाण्यातील मोक्का प्रकरणातही फरार होता.
दोन्ही आरोपी वारंवार ठिकाणे बदलत होते. मोबाईलचा वापर टाळून आणि वेषांतर करून ते पोलिसांना गुंगारा देत होते. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी सातारा जिल्ह्यात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार विशेष पथकाने ७ जून २०२६ रोजी सापळा रचून दोघांना अटक केली.
अटकेनंतर आरोपींकडून दोन गावठी पिस्तुले व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील तसेच तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.









