By, भारत गायकवाड
माळेगाव, दि. १५ – पुणे ग्रामीण पोलिसांच्या ‘ऑपरेशन क्लिनिंग’ मोहिमेंतर्गत माळेगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत चार सराईत आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चार गावठी कट्टे, एक रायफल आणि एक चाकू असा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांच्या पथकाने माळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही विशेष मोहीम राबवली. सांगवी, मेडद आणि कऱ्हावागज परिसरातील काही सराईत गुन्हेगारांकडे अवैधरित्या गावठी कट्टे, रायफल व इतर शस्त्रे असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
माहितीच्या आधारे सांगवी येथील अक्षय कल्याण तावरे याच्या घराची झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान तीन गावठी कट्टे आणि एक रायफल जप्त करण्यात आली. त्यानंतर तावरे याला अटक करण्यात आली. पुढील तपासात गणेश तात्याराम गावडे (रा. मेडद) आणि मयूर विष्णू मोरे (रा. कऱ्हावागज) यांच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. या दोघांकडून एक गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला असून त्यांनाही अटक करण्यात आली आहे.
अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिराजदार यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. जामिनावर सुटल्यानंतर त्यांनी शस्त्रांच्या बळावर परिसरात दहशत निर्माण करून आर्थिक फायदा मिळविण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती तपासातून समोर आली आहे. सोशल मीडियावर रिल्सच्या माध्यमातूनही भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, बारामती तालुक्यात महिला सुरक्षा, अल्पवयीन गुन्हेगारीवर नियंत्रण, अवैध व्यवसायांवर कारवाई, विषारी दारूविरोधी मोहीम आणि रस्ते सुरक्षा यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहितीही बिराजदार यांनी दिली. तसेच अल्पवयीन मुलांना वाहन चालवू देणाऱ्या पालकांवरही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.








