By’ Avishkar Fule
पिंपरी, ता. ११ : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लागू असलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करत दोन लोखंडी कोयते बाळगल्याप्रकरणी दिघी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई चऱ्होली परिसरातील कोतवालवाडी येथे करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस शिपाई बाबाजी मारुती जाधव यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वाघेश्वर कृष्णा रसाळ (वय १९, रा. गणेशनगर, कोतवालवाडी रोड, चऱ्होली), अथर्व तानाजी शिंदे (रा. साठे वस्ती, कोतवालवाडी, चऱ्होली) आणि कृष्णा वाघोले (रा. गणेशनगर, कोतवालवाडी, चऱ्होली) यांच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ९) पहाटे सव्वा एकच्या सुमारास वाघेश्वर विद्यालयाजवळील साठे वस्ती परिसरात आरोपींकडे दोन लोखंडी कोयते आढळून आले. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी शस्त्रे बाळगण्यास मनाई करणारे आदेश लागू केले असतानाही आरोपींनी त्याचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले.
दिघी पोलीस पुढील तपास करत आहेत.








