By’ Avishkar Fule
पिंपरी, ता. ११ : बोपखेल परिसरात घराची चावी विश्वासाने दिल्यानंतरच घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी महिला कोल्हापूर येथे गेल्याचा फायदा घेत आरोपीने घरातील तब्बल ४ लाख ४७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना समोर आली. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनीषा दिपक हिरवळे (वय ३८, रा. शिवनंदन पार्क, गणेशनगर, बोपखेल) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अवतार सिंघविर सिंघ सोहल (सध्या रा. गणेशनगर, बोपखेल, मूळ रा. जालंधर, पंजाब) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३१६(२) आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या ६ ते १० मे दरम्यान कोल्हापूर येथे गेल्या होत्या. घरातील मांजरींना खाऊ घालण्यासाठी त्यांनी आरोपीकडे घराची चावी विश्वासाने दिली होती. दरम्यान, ७ मे रोजी आरोपीने फिर्यादी यांना फोन करून शिवीगाळ करत धमकी दिली. तसेच “तुला आता दाखवतो, तुझा जीव घेतो,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
यानंतर आरोपीने फिर्यादींच्या घरातील लाकडी कपाटाचा ड्रॉवर उघडून १४ तोळे ९ ग्रॅम वजनाचे सुमारे ४ लाख ४७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा आरोप आहे. दिघी पोलिस अधिक तपास करत आहेत.








