- By, हनुमंत सुरवसे
उरुळी कांचन : रस्त्यावर कर्कश आवाज करत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मॉडिफाइड सायलेंसरधारी दुचाकीस्वारांविरोधात उरुळी कांचन पोलिसांनी धडक कारवाई केली. विशेष मोहिम राबवत पोलिसांनी बेकायदेशीर सायलेंसर जप्त करून जेसीबीच्या सहाय्याने जागीच नष्ट केले. या कारवाईमुळे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
परिसरात गेल्या काही दिवसांपासून मॉडिफाइड सायलेंसरमुळे नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त होत होत्या. त्याची गंभीर दखल घेत उरुळी कांचन पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम हाती घेतली. मोहिमेदरम्यान अनेक दुचाकींची तपासणी करण्यात आली. नियमबाह्य सायलेंसर आढळून आलेल्या वाहनांवर कारवाई करत ते जप्त करण्यात आले.
जप्त केलेले सायलेंसर एका मोकळ्या मैदानात ठेवून त्यावर जेसीबी फिरवून नष्ट करण्यात आले. पोलिसांच्या या कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांकडून कारवाईचे स्वागत केले जात आहे.
या विशेष मोहिमेत पोलिसांनी 27 वाहनचालकांवर कारवाई करत सुमारे 22 हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच वाहतुकीच्या इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात आली.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रमेश भोसले, पोलीस हवालदार कमलेश होले, संतोष जाधव, उद्धव गायकवाड, प्रशांत पवार तसेच पोलीस कॉन्स्टेबल अश्वजीत मोहोळ, अमोल खांडेकर, शरद चव्हाण, प्रदीप बालगुडे आणि सुमित वाघ यांच्या पथकाने केली.
“ध्वनी प्रदूषण करणारे तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधातील कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे,” असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिला.








