शेवाळेवाडीत कारची काच फोडून २.९५ लाखांची रोकड चोरी


 


By, हनुमंत सुरवसे

शेवाळेवाडी, ता. ११ : पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळेवाडी परिसरात भरदिवसा कारची काच फोडून अज्ञात चोरट्याने तब्बल २ लाख ९५ हजार ५०० रुपयांची रोकड व महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याप्रकरणी राजेंद्र किसन शिंदे (वय ४३, रा. पांढरवाडी, ता. पाटण, जि. सातारा) यांनी मांजरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे हे गाडी खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. बुधवारी (ता. ६) ते मित्रासह जुनी कार पाहण्यासाठी पुण्यात आले होते. शेवाळेवाडी येथील कानिफनाथ हॉटेलसमोर त्यांनी त्यांची अर्टिगा कार (एमएच १२ एलपी ९७१५) उभी केली होती. वाहन खरेदीचा व्यवहार झाल्यास तातडीने पैसे देता यावेत, यासाठी त्यांनी कारमध्ये एका बॅगेत २ लाख ९५ हजार रुपये रोख ठेवले होते.

दरम्यान, शिंदे व त्यांचे मित्र संबंधित पक्षासोबत हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेले होते. साधारण १५ ते २० मिनिटांनंतर ते परत आल्यानंतर कारच्या उजव्या बाजूची काच फुटलेली दिसली. त्यांनी कारची तपासणी केली असता, रोकड व महत्त्वाची कागदपत्रे असलेली काळ्या रंगाची बॅग चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.

घटनेनंतर शिंदे यांनी तातडीने ‘डायल ११२’ वर संपर्क साधला. मांजरी पोलिस चौकीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास मांजरी पोलिस करत आहेत.


19
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!