खुनाच्या प्रयत्नातील एक वर्षापासून फरार आरोपी जेरबंद


By, Avishkar Fule

पुणे, ता. १४ : खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात गेल्या एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी मुंढवा परिसरातून ताब्यात घेत अटक केली. संगमेश्वर केरबा अर्जुने (वय २५, रा. जाधव वस्ती, हडपसर रेल्वे स्टेशनजवळ, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मे २०२५ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ताडीवाला रोड येथील मारुती मंदिराजवळ फिर्यादी उभे असताना जुन्या भांडणाच्या रागातून आरोपी राम गंगाधर क्षीरसागर, अकलम अलीअकबर शेख, संगमेश्वर अर्जुने व एका विधिसंघर्षग्रस्त बालकाने फिर्यादीवर लोखंडी धारदार शस्त्राने हल्ला केला होता. डोक्यात व पाठीवर वार करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले होते.

या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७६/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०९, ३(५), आर्म अॅक्ट कलम ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्यातील आरोपी संगमेश्वर अर्जुने हा गेल्या एक वर्षापासून फरार होता. तो मुंढवा परिसरात येणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार प्रदीप शितोळे व प्रकाश आव्हाड यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर १३ मे २०२६ रोजी रात्री ९.४० वाजता त्याला अटक करण्यात आली.

ही कारवाई अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक पोलिस आयुक्त संगिता आल्फान्सो शिंदे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलिस अंमलदार प्रदीप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनीष संकपाळ, मनोज भोकरे आणि ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या पथकाने केली.


19
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!