दखलपात्र गुन्ह्याच्या तयारीत असलेले सख्खे भाऊ जेरबंद गावठी पिस्टल, पाच जिवंत काडतुसे आणि धारदार चाकू जप्त; वानवडी पोलिसांची कारवाई


By, Avishkar Fule

पुणे, ता. १४ : दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत फिरत असलेल्या दोन सख्ख्या भावांना वानवडी पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून गावठी बनावटीचे पिस्टल, पाच जिवंत काडतुसे, धारदार लोखंडी चाकू आणि अॅक्टीव्हा दुचाकी असा एकूण १ लाख १२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

साहील रफिक शेख (वय २१) आणि सद्दाम रफिक शेख (वय २५, दोघे रा. खजुरेवस्ती, राजा बकशार दर्गाजवळ, वैदवाडी, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

वानवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक हे पथकासह परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार अभिजित चव्हाण यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चॉकलेटी रंगाच्या अॅक्टीव्हा स्कुटरवरून दोन संशयित इसम अग्निशस्त्र बाळगून फिरत असून, ते गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत आहेत.

माहितीची खातरजमा करून वरिष्ठांच्या परवानगीनंतर पोलिसांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान साहील शेख याच्याकडे धारदार लोखंडी चाकू, तर सद्दाम शेख याच्याकडे गावठी पिस्टल, मॅगझिन आणि पाच जिवंत काडतुसे आढळून आली. आरोपींकडे कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शस्त्रे आणि दुचाकी जप्त करण्यात आली.

या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २१६/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३ (२५), ४ (२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक करीत आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त नम्रता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता जाधव यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख तसेच पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाने, अभिजित चव्हाण, विठ्ठल चोरमले, गोपाळ मदने, अमोल गायकवाड, बालाजी वाघमारे, विष्णु सुतार, अर्शद सय्यद, आशिष कांबळे आणि कैलास सपकाळ यांनी सहभाग घेतला.


19
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!