By, suraj Jagtap
शिरूर, ता. १५ : रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत व धोकादायक गुन्हेगार सुरज राजेश पाडळे (वय २६, रा. सोनेसांगवी, ता. शिरूर) याला महाराष्ट्र प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत स्थानबद्ध करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याने सुरज पाडळे याच्याविरोधात प्रस्ताव सादर केला होता.
पाडळे याच्यावर दरोडा, खंडणी, घातक शस्त्र बाळगणे, प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करणे, दहशत निर्माण करणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. भारतीय दंड विधान, भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच हत्यार कायद्यान्वये त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत.
पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी तयार केलेला प्रस्ताव पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे पाठविला होता. प्रस्तावाचा आढावा घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, धोकादायक व्यक्ती व इतर विघातक कृत्यांना प्रतिबंध करणाऱ्या एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेचे आदेश दिले.
त्यानुसार पोलिसांनी विशेष पथके तयार करून सुरज पाडळे याचा शोध घेतला. १३ मे रोजी त्याला ताब्यात घेऊन नागपूर मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, रांजणगाव एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्यासह अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला.








