डिझेल चोरी? प्रकरणानंतर पेट्रोल कंपन्या सतर्क; मोठ्या कारवाईचे संकेत लोणी काळभोर टर्मिनलवरील संशयित टँकर रडारवर; विशेष बैठकीची शक्यता


प्रतिनिधी | अविष्कार फुले

लोणी काळभोर : एचपी हिंदुस्तान पेट्रोलियमच्या लोणी काळभोर टर्मिनलमधून इंधन वाहतूक करणाऱ्या काही टँकरमधील कथित डिझेल चोरी प्रकरणाची बातमी “ठळक घडामोड”मधून प्रसारित झाल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित कंपन्यांकडून अंतर्गत हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत असून, लवकरच उच्चस्तरीय बैठक आयोजित केली जाणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

सूत्रांच्या माहितीनुसार, टर्मिनलमधून इंधन वाहतूक करणाऱ्या काही संशयित टँकरची माहिती गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे. गुप्त अंडर पाईपलाईन, फेरफार केलेले ‘डीप पाईप’, तसेच इंधन मोजमापात छेडछाड केल्याच्या आरोपांमुळे अनेक टँकर आणि संबंधित ट्रान्सपोर्ट साखळी आता रडारवर आल्याचे बोलले जात आहे.

टँकर मालकांची धावपळ सुरू?

दरम्यान, या प्रकरणाची चर्चा वाढताच काही टँकर मालकांकडून टँकरमध्ये बसवण्यात आलेली कथित अंडर पाईपलाईन सिस्टीम काढण्यासाठी घाईगडबड सुरू असल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. अचानक तपासणी किंवा तांत्रिक पडताळणी होण्याची शक्यता लक्षात घेऊन काही वाहनांमध्ये बदल करण्यात येत असल्याची चर्चा ट्रान्सपोर्ट वर्तुळात रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टँकरच्या मुख्य टाकीतून इंजिनकडे जाणाऱ्या लाईनमध्ये गुप्त पाईपलाईन जोडून डिझेल वळवले जात असल्याचा संशय आहे. ही यंत्रणा अत्यंत कौशल्याने बसवण्यात आल्याने सामान्य तपासणीत ती सहज आढळत नसल्याचे सांगितले जात आहे. व्हॉल्व्हच्या मदतीने टँकर भरताना किंवा इंधन उतरवताना डिझेल चोरी होत असल्याचा आरोपही पुढे येत आहे.

फेरफार केलेल्या पाईपचीही चर्चा

याशिवाय ‘डीप पाईप’मध्ये तांत्रिक बदल करून इंधनाच्या मोजमापात फेरफार केल्याची चर्चा देखील जोर धरत आहे. तपास दिशाभूल करण्यासाठी मूळ पाईपमध्ये अतिरिक्त तुकडे बसवले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मोठ्या खुलाशाची शक्यता

या प्रकरणात सहभागी असल्याचा संशय असलेल्या काही टँकर, चालक आणि ट्रान्सपोर्टरची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठा खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित पेट्रोलियम कंपन्यांकडून अचानक तपासणी, कॅलिब्रेशन चाचण्या आणि स्वतंत्र चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, “वर्षानुवर्षे काही मोजक्याच ट्रान्सपोर्टरना सातत्याने काम का दिले जाते?” या प्रश्नावरूनही ट्रान्सपोर्ट क्षेत्रात चर्चा रंगू लागली आहे. काही अधिकारी आणि ट्रान्सपोर्टर यांच्यातील कथित संबंधांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


19
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!