लोणी काळभोरमध्ये गुटखा तस्करीचा भांडाफोड महिलेच्या घरातून ५ लाखांचा प्रतिबंधित माल जप्त; किराणा दुकानाच्या आड सुरू होता अवैध व्यवसाय


By, Hanumant Survase

लोणी काळभोर, ता. १५ : राज्यात गुटखा बंदी लागू असतानाही लोणी काळभोर परिसरात गुटख्याचा काळाबाजार सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. लोणी काळभोर पोलिसांनी माळी मळा परिसरात छापा टाकून तब्बल ५ लाख ७ हजार १९९ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. या प्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

वैशाली संजय खेतमाळीस (वय ४८) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पोलीस अंमलदार अशोक भागवत गिरी यांनी सरकारतर्फे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट-६ चे पथक बुधवारी (ता. १३) नियमित गस्त घालत असताना माळी मळा परिसरातील एका घरातून गुटख्याची अवैध विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ छापा टाकला.

घरातूनच सुरू होता प्रतिबंधित मालाचा साठा

कारवाईदरम्यान घरामध्ये पोती आणि बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ साठवून ठेवलेले आढळले. डायरेक्टर स्पेशल पान मसाला, विमल पान मसाला, आरएमडी, रजनीगंधा, वी-१ तंबाखू, तुलसी तंबाखू आणि शॉट प्रीमियम च्युइंग टोबॅको यांसारख्या प्रतिबंधित ब्रँडचा साठा पोलिसांनी जप्त केला.

पोलिसांनी पंचांसमक्ष संपूर्ण मुद्देमाल जप्त करून नमुने सीलबंद केले आहेत. या प्रकरणी अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किराणा दुकानाच्या आडून सुरू होता व्यवसाय

तपासादरम्यान किराणा दुकानाच्या आडून गुटखा विक्रीचे रॅकेट सुरू असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गुटखा आणि सुगंधित तंबाखूमुळे मुखाचा कर्करोग, हृदयविकार यांसारखे गंभीर आजार होतात, हे माहिती असूनही आर्थिक फायद्यासाठी हा व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांनी नमूद केले.

पुरवठादारांच्या शोधासाठी तपास वेगात

एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा लोणी काळभोरमध्ये कोणाकडून आणला जात होता, यामागे कोणते मोठे पुरवठादार कार्यरत आहेत, तसेच पुणे जिल्ह्यात आणखी कुठे असे रॅकेट सुरू आहे का, याचा पोलीस तपास सुरू आहे. या कारवाईनंतर गुटखा विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


19
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!