विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीवर छळाचे आरोप, नातेवाईकांकडून घातपाताचा संशय


By, Avishkar Fule

लोणी काळभोर, ता. ६ (प्रतिनिधी) : लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरात एका २४ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (५ जून) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणात मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी पतीवर गंभीर आरोप करत घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे.

मृत विवाहितेचे नाव प्रियांका लक्ष्मण वाघमारे (वय २४) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका यांनी घरातील खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी संशय व्यक्त केला असून पती लक्ष्मण वाघमारे हा दारूच्या नशेत वारंवार मारहाण व मानसिक छळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पुण्यातील रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, मृत्यूमागील कारणांचा सखोल तपास करण्याची मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे.


20
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!