By, Avishkar Fule
लोणी काळभोर, ता. ६ : चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील हनुमान मंदिर परिसरात गुरुवारी (ता. ४) मध्यरात्री घडली. गंभीर जखमी झालेल्या विवाहितेवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणी शितल शरद वारे (वय ३४) या जखमी झाल्या असून, गोरख वारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शरद विठ्ठल वारे (वय ३७, रा. पठारेवस्ती, कदमवाकवस्ती) याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शरद वारे याला दारूचे व्यसन असून तो पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता. या कारणावरून पती-पत्नीत नेहमी वाद होत असत. गुरुवारी रात्रीही तो मद्यधुंद अवस्थेत पत्नीशी वाद घालत होता. त्यावेळी त्याने पत्नीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे नातेवाइकांनी सांगितले.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शरद वारे याने पत्नीच्या मोबाईलवरून त्याचा चुलत भाऊ गोरख संजय वारे याला फोन करून, “माझे आणि शितलचे भांडण झाले असून मी तिच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले आहे,” असे सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.
फोन आल्यानंतर गोरख वारे व शितल यांच्या बहिणीने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हनुमान मंदिरासमोरील परिसरात रक्ताचे डाग आढळून आल्याने घटनेची खात्री झाली. त्यानंतर विश्वराज रुग्णालयात चौकशी केली असता शितल वारे यांना पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आल्याचे समजले. ससून रुग्णालयात पोहोचल्यावर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे आणि त्या बेशुद्ध अवस्थेत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी खूनाच्या प्रयत्नासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.








