By, Avishkar Fule
पुणे, दि. १२ जून २०२६: समर्थ पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ ने रेकॉर्डवरील आरोपीला ताब्यात घेऊन घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपीकडून चोरीतील ३० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
समर्थ पोलीस ठाणे गु.र.नं. १५९/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०५(अ) अन्वये दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख व त्यांच्या पथकाने सुमारे १०० ते १५० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तपासात घरफोडीसाठी निळ्या रंगाची अॅक्टिव्हा मोपेड वापरण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर वाहनाचा मूळ मालक व सध्या वाहन वापरणाऱ्या व्यक्तीची माहिती मिळवून मनीष महेंद्र काकडे (वय २९, रा. सुखसागर नगर, कात्रज, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीने आपल्या भावाची अॅक्टिव्हा घेऊन अग्रवाल कॉलनीजवळ वाहन उभे केले व तेथून भिंत ओलांडून भवानी पेठ येथील क्रिस्टल टॉवर सोसायटीमध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली.
आरोपीकडे चोरीतील रक्कम व मोबाईलबाबत विचारणा केली असता तो टाळाटाळ करू लागला. त्यानंतर पंचांसमक्ष वाहनाची डिक्की तपासण्यात आली असता त्यामध्ये ३० हजार रुपयांची रोकड आढळून आली. चोरीतील मोबाईल त्याने एका ओळखीच्या मित्राला दिल्याचे सांगितले.
आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी समर्थ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-३) शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार रविंद्र लोखंडे, अजित शिंदे, प्रदीप राठोड, गणेश ढगे, अमित गद्रे, महेश पाटील, बाळू गायकवाड, धनंजय ताजणे तसेच महिला पोलीस अंमलदार साधना पवार यांनी या कारवाईत सहभाग घेतला.








