गंगापूर धरणात दुर्दैवी दुर्घटना; तीन चुलत भाऊ व आतेबहिणीचा बुडून मृत्यू


By, महेश जवळकर

नाशिक, ता. १२ : गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या तीन चुलत भावांसह त्यांच्या आतेबहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी घडली. या दुर्घटनेत एक युवती बचावली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेमुळे सावरगाव गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

मयूरी पवन जाधव (वय २१, रा. त्र्यंबकेश्वर), गणेश सुरेश गोतरणे (वय १६), निखिल मच्छिंद्र गोतरणे (वय १६) आणि साहिल मनोहर गोतरणे (वय १७, तिघे रा. सावरगाव, ता. नाशिक) अशी मृतांची नावे आहेत. तर रूपाली रामदास धनगर (वय १७, रा. चौकी माथा, त्र्यंबकेश्वर) ही युवती बचावली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सावरगाव येथील काही युवक-युवती गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात पोहण्यासाठी गेले होते. यावेळी एकजण अचानक खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात इतरही पाण्यात उतरले; मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने चौघेही बुडाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने रूपाली धनगर हिला वाचविण्यात यश आले.

घटनेची माहिती मिळताच नाशिक तालुका पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मृदुला नाईक यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनी चौघांना बाहेर काढले; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. मृतदेहांचे पंचनामे करून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

वाढदिवसासाठी आली अन् काळाने घाला घातला

मयूरी जाधव ही विवाहिता असून भावाच्या वाढदिवसानिमित्त मामाच्या गावी सावरगाव येथे आली होती. दुपारी मामाच्या मुलांसोबत गंगापूर धरण परिसरात गेल्यानंतर ही दुर्घटना घडली. मयूरीला आठ ते दहा महिन्यांचे लहान बाळ असून तिच्या निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

घरातील एकुलत्या मुलांचा अंत

मृत्यूमुखी पडलेले निखिल, गणेश आणि साहिल हे तिघेही चुलत भाऊ असून तिघेही आपल्या घरातील एकुलते होते. नुकतेच त्यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. निखिल व गणेश यांना पोहता येत असतानाही पाण्याच्या खोलीचा चुकीचा अंदाज त्यांच्यासाठी घातक ठरला.

बॅकवॉटरमधील खोल खड्डे धोकादायक

गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात गाळ काढण्याच्या कामामुळे अनेक ठिकाणी १५ ते २० फूट खोल खड्डे निर्माण झाले आहेत. पाण्यातील गाळामुळे खोलीचा अंदाज येत नसल्याने पर्यटकांसाठी हा परिसर धोकादायक बनला आहे. प्राथमिक माहितीनुसार, अशाच खोल खड्ड्यात अडकल्याने ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

वाढत्या दुर्घटनांमुळे सुरक्षा उपायांची मागणी

अलीकडील काळात कश्यपी, गंगापूर, चणकापूर आणि वैतरणा धरण परिसरात बुडून मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे धरण परिसरातील धोकादायक ठिकाणी प्रवेशबंदी करावी, चेतावणी फलक लावावेत आणि पोलिस बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, चौघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. या घटनेने सावरगाव गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


27
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!