By, अविष्कार फुले
पुणे : बाथरूमच्या खिडकीतून घरात प्रवेश करून ₹३.७० लाखांची रोकड चोरणाऱ्या दोन आरोपींना खडक पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीतील ₹२ लाख २४ हजार १०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जून २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी घराला कुलूप लावून जेवणासाठी बाहेर गेले होते. रात्री साडेअकराच्या सुमारास घरी परतल्यानंतर घरातील कपाट उघडे असल्याचे आणि बाथरूमच्या खिडकीच्या काचा काढलेल्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कपाटाची पाहणी केली असता त्यामध्ये ठेवलेली ₹३.७० लाखांची रोकड चोरीस गेल्याचे आढळले.
याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(४) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) शर्मिला सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, पोलीस उपनिरीक्षक सचिन ताळीकोटे, पोलीस हवालदार हर्षल दुडम, किरण ठवरे, तसेच पोलीस अंमलदार कृष्णा गायकवाड, दिनेश गायकवाड, शुभम केदारी, अक्षयकुमार वाबळे, विश्वजीत गोरे, विकास पांडोळे, भाऊसाहेब सोडमिसे, दिनेश दिवटे, अर्जुन कुडाळकर आणि पांडुरंग चंदेल यांनी सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला.
तपासादरम्यान पोलिसांनी ड्रौद जमीर दलाल (वय २५, रा. चाँद तारा चौक, मक्का टॉवर, मोमीनपुरा, घोरपडी पेठ, पुणे) आणि वासिक अनिस शेख (वय २०, रा. चाँद तारा चौक, मोमीनपुरा, घोरपडी पेठ, पुणे) यांना गुलटेकडी व मोमीनपुरा परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून चोरीतील ₹२,२४,१०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी ड्रौद दलाल हा सराईत व अभिलेखावरील आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही आरोपींना न्यायालयाने १३ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.








