By, Avishkar Fule
खेड शिवापूर, ता. १२ (प्रतिनिधी) : शिंदेवाडी (ता. भोर) येथील अवैध सोरट जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी धाड टाकून तब्बल ३० लाख ६५ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सचिन अंकुश बागल (४७), मनोज दिनकर काळाणे (५३), गणेश पांडुरंग वाळूज (३९), धनाजी राजाभाऊ जाधव (३६), निखिल रामचंद्र तुंगतकर (३०, सर्व रा. कात्रज, पुणे) आणि सशांक मच्छिंद्र मेमाणे (३०, रा. धनकवडी, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदेवाडी येथील जुन्या कात्रज बोगद्याजवळ असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये सोरट जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती राजगड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. कारवाईदरम्यान सहा जणांना ताब्यात घेण्यात आले, तर अन्य १० ते १२ जण अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाले.
या धाडीत जुगाराचे साहित्य, मोबाईल फोन तसेच वाहने असा एकूण ३० लाख ६५ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फरार झालेल्या संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, नुकताच राजगड पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक राजेश यादव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण बकले, पोलीस कर्मचारी सागर गायकवाड, पप्पू शिंदे, गणेश साबळे, प्रशांत राऊत, समीर भोसले, हनुमान पार्कराव तसेच चालक चंद्रोदय हगवणे यांनी सहभाग घेतला.








