By, हनुमंत सुरवसे
उरुळी कांचन, प्रतिनिधी : उरुळी कांचन येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणलेल्या एका मृतदेहाची अत्यंत धक्कादायक परिस्थितीत विटंबना झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रात्रभर शवविच्छेदन न झाल्याने मृतदेह उघड्यावर पडून राहिला आणि त्याच्या डोळे, तोंड तसेच शरीरावर लाल मुंग्यांनी मोठ्या प्रमाणात गराडा घातल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन येथील मनीष शांताराम कांचन (वय ४०) यांनी शुक्रवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया आणि शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह मध्यरात्रीनंतर उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी शवविच्छेदनाची तयारी केली होती. मात्र, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे प्रक्रिया रखडल्याचे सांगण्यात येत आहे. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित डॉक्टरांनी रुग्णालयात येण्याचे सांगितले होते; मात्र सकाळपर्यंत त्या उपस्थित झाल्या नाहीत.
दरम्यान, सकाळी शवविच्छेदनास विलंब होत असल्याने नातेवाईकांनी शवविच्छेदन कक्षात जाऊन पाहणी केली. त्यावेळी मृतदेहाच्या डोळ्यांवर, तोंडावर व शरीराच्या विविध भागांवर मोठ्या प्रमाणात लाल मुंग्या असल्याचे दिसून आल्याचा दावा त्यांनी केला. हा प्रकार पाहून नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि रुग्णालय प्रशासनाविरोधात निषेध नोंदविला.
घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्येही संतापाची भावना व्यक्त होत आहे. मृतदेहाच्या सन्मानाचे रक्षण करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
या प्रकरणी नातेवाईकांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप केला असून चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, या घटनेबाबत रुग्णालय प्रशासनाची अधिकृत भूमिका समोर आलेली नसून, चौकशीअंती वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. प्रशासनाकडून या प्रकरणाची दखल घेतली जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








