शेतात पडलेल्या ११ केव्ही विद्युत तारेचा धक्का; युवकाचा दुर्दैवी मृत्यू


By, सुरज जगताप

गुनाट, ता. १४ : शिंदोडी (ता. शिरूर) येथील एका युवकाचा शेतात पडलेल्या महावितरणच्या ११ केव्ही विद्युत तारेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. १४) दुपारी बाराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय धुळा हाके (वय २७, रा. शिंदोडी, ता. शिरूर) हा आपल्या ऊसाच्या शेतात पाणी देत होता. यावेळी शेतात पडलेल्या ११ केव्ही विद्युत तारेचा त्याला अंदाज आला नाही. तारेचा स्पर्श होताच त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

अक्षयच्या पश्चात आई, भाऊ आणि चुलते असा परिवार आहे. त्याच्या अकाली निधनामुळे गावावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, महिनाभरापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे या परिसरातील अनेक विद्युत खांब व वीजवाहिन्यांची अवस्था दयनीय झाली आहे. महावितरणकडून दुरुस्तीचे काम सुरू असले तरी अपुऱ्या मनुष्यबळामुळे अनेक ठिकाणी कामे रखडल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

या दुर्घटनेनंतर ग्रामस्थांनी महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, धोकादायक वीजवाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करून अशा घटना टाळाव्यात, अशी मागणी केली आहे.


29
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!