मालवलीत किरकोळ वादातून १८ वर्षीय युवकाचा गळा दाबून खून; विधिसंघर्षित बालक ताब्यात


By, Avishkar Fule

वेल्हे, ता. १५ : राजगड तालुक्यातील मालवली गावात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान खुनात झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. १४) दुपारी घडली. या घटनेत १८ वर्षीय युवकाचा गळा दाबून खून करण्यात आला असून वेल्हे पोलिसांनी १५ वर्षे १० महिने वयाच्या विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे.

मृत युवकाचे नाव विकास सुरेश जाधव (वय १८, रा. मालवली, ता. राजगड) असे आहे. याप्रकरणी रोहन पांडुरंग पवार (वय २३) यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवली येथील राजतोरण शाळेच्या मैदानाजवळ रविवारी दुपारी काही युवकांमध्ये किरकोळ वाद झाला होता. उपस्थितांनी मध्यस्थी करून वाद मिटवला आणि सर्वजण तेथून निघून गेले. मात्र, काही वेळाने आरोपीने पुन्हा मैदानाजवळ जाण्याचा आग्रह धरला. त्यानंतर विकास जाधव आणि आरोपी यांच्यात पुन्हा शाब्दिक बाचाबाची झाली.

वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी आरोपीने विकासचा गळा जोरात दाबल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. उपस्थितांनी दोघांना वेगळे केले. मात्र, त्यानंतर विकासची प्रकृती बिघडली. तो बोलत नसल्याने व पाणीही पीत नसल्याने त्याला तातडीने वेल्हे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन आवश्यक पुरावे संकलित केले. आरोपी विधिसंघर्षित बालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे मालवली परिसरात हळहळ व्यक्त होत असून किरकोळ वादातून एका युवकाचा जीव गेल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


29
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!