By, Avishkar Fule
सासवड, ता. १५ : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी तसेच मोक्का आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या सराईत आरोपीला सासवड पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. अक्षय उर्फ गोट्या संभाजी खेनट (वय २७, रा. पिंपळे, ता. पुरंदर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १३७(२), ६४, ६४(२)(एम) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ४, ६, ८ व १२ अंतर्गत ८ मार्च २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपीने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी याबाबत सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी तब्बल तीन महिन्यांपासून फरार होता. तो सतत ठिकाणे बदलत असल्याने त्याला अटक करणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होते. दरम्यान, फरार असतानाच त्याने सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी दोन गंभीर गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुन्हा क्रमांक १६४/२०२६ आणि २६०/२०२६ दाखल करण्यात आले होते.
तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सासवड पोलिसांनी आरोपीचा माग काढला. त्याचा पाठलाग करून अखेर त्याला अटक करण्यात आली. अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला १६ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध येरवडा, राजगड, जेजुरी आणि सासवड पोलीस ठाण्यांमध्ये खूनाचा प्रयत्न, दरोडा, बलात्कार, अपहरण, मारहाण आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत एकूण सात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील, पोलीस शिपाई सचिन किवळे, तुषार लोंढे, प्रविण शेंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे करीत आहेत.








