By, अविष्कार फुले
दिघी | प्रतिनिधी ; दिघी परिसरात फायरिंग करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तसेच ७० पेक्षा अधिक चोरीच्या गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या मुख्य फरार आरोपीला मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर संभाजी जाधव (वय २५, रा. मोघा, ता. उदगीर, जि. लातूर) याच्याविरुद्ध १३ मे २०२६ रोजी दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फायरिंग करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात शेखर जाधव व त्याचे तीन साथीदार गुन्हा घडल्यानंतर फरार झाले होते.
दरम्यान, १६ मे रोजी आरोपी रांजणगाव परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेचे पथक त्याला पकडण्यासाठी गेले होते. मात्र आरोपींनी पाठलाग करणाऱ्या पोलीस पथकावर गोळीबार करून उसाच्या शेताचा फायदा घेत तेथून पळ काढला होता. याप्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यातही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मुख्य आरोपीच्या शोधासाठी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने तांत्रिक तपासासह नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांत अनेक वेळा शोधमोहीम राबवली. गोपनीय माहितीदारांच्या मदतीने आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले.
अखेर 14 जून 2026 रोजी सायंकाळी मोझे शाळेजवळील मोकळ्या मैदानात सापळा रचून पोलिसांनी शेखर जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे 51 हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमांतर्गत नवीन गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते व त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली.








