सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तीन आरोपी जेरबंद


By, अविष्कार फुले

पुणे : हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा छडा लावत गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने तीन आरोपींना अटक केली आहे.

हडपसर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३९१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ३५२ व ३(५) अंतर्गत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना युनिट-६ चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने घटनास्थळ परिसरातील सुमारे ५० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्यात आली.

त्यानुसार वैष्णव अनिल शेवाळे (वय २४, रा. गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक, पुणे), रिहान महमंद सय्यद (वय १९, रा. गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक, पुणे) आणि यश प्रविण सोनवणे (वय २४, रा. ढेरे बंगला, मांजरी बुद्रुक, पुणे) यांना ताब्यात घेण्यात आले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपींना हडपसर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्यासह पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, श्रीकांत पांडुळे, अमित कांबळे, प्रमोद टिळेकर, गणेश माने, उमेश शेलार, शेखर काटे आणि अनिल जामगे यांनी सहभाग घेतला.


27
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!