एक वर्षापासून फरार असलेला सराईत आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात


By, Avishkar Fule

पुणे, दि. 13 : आंबेगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या आर्म अॅक्टच्या गुन्ह्यातील एक वर्षापासून पाहिजे असलेला सराईत आरोपी अजित सागर कसबे (वय 22, रा. राजीव गांधी वसाहत, चव्हाणनगर, धनकवडी, पुणे) याला पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-2च्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईमुळे पोलिसांच्या शोधात असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात यश आले आहे.

गुन्हे शाखा युनिट-2चे अधिकारी आणि कर्मचारी १२ जून रोजी त्यांच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत असताना तसेच पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी आणि शिवानंद कायगुडे यांना गुप्त माहिती मिळाली. आंबेगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक १५८/२०२६ मधील पाहिजे आरोपी अजित कसबे हा स्वामीनारायण मंदिराजवळील सर्व्हिस रोड परिसरात थांबलेला असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही बाब युनिट-2च्या प्रभारी पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांना कळविण्यात आली.

त्यानंतर पोलिसांनी तत्काळ सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला आणि आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपली ओळख अजित सागर कसबे अशी सांगितली. आरोपीविरुद्ध सहकारनगर, पर्वती आणि आंबेगाव पोलीस ठाण्यांमध्ये आर्म अॅक्ट तसेच इतर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तो अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून पोलिसांच्या शोधात होता.

अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील कारवाईसाठी आंबेगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून संबंधित गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गोहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दवळी तसेच पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शिवानंद कायगुडे, सर्जेराव सरगर, संजय टकले, शंकर कुंभार, साधना ताम्हाणे, शंकर नेवसे, योगेश मांढरे, नागनाथ राख, विजयकुमार पवार, सद्दाम तांबोळी, अजीम शेख, विद्या शिंदे, विनोद चव्हाण, संजय आबनावे, विशाल दळवी, संदीप शिर्के, ओमकार कुंभार, ऋषिकेश व्यवहारे आणि विनायक वगारे यांनी सहभाग घेतला.


29
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!