चौफुला परिसरात पिस्टलचा धाक दाखवून दहशत माजवणारे दोघे जेरबंद; अवघ्या दोन तासांत यवत पोलिसांची कारवाई


By, Avishkar Fule

यवत, प्रतिनिधी : चौफुला परिसरात विनापरवाना गावठी पिस्टलचा धाक दाखवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना यवत पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक करत त्यांच्याकडून अवैध गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त केले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १२ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास बोरीपार्धी (ता. दौंड) येथील रेणुका कलाकेंद्रामध्ये मयूर दत्तू पाटील (वय २६) व पवन कल्लू बर्मी (वय २१), दोघेही रा. पिंपळवाडी रोड, उरुळी कांचन यांनी बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल व जिवंत काडतूस जवळ बाळगून सोमनाथ छगन माने (वय ३०, रा. वेताळबाबा वसाहत, गाडीतळ, हडपसर) यांना शस्त्राचा धाक दाखवून शिवीगाळ व दमदाटी केली. या प्रकारामुळे चौफुला परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणी सोमनाथ माने यांच्या फिर्यादीवरून यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ५७८/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३५२, ३५१ (२), ३(५) तसेच भारतीय हत्यार कायद्यानुसार कलम ३ व २५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गुन्हा घडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी यवत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज यांनी विशेष पथक तयार केले. तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवून दोन्ही आरोपींना गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत ताब्यात घेतले.

अटकेदरम्यान आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले अवैध गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या व दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात सातत्याने कठोर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण गाडेकर, परशुराम म्हस्के, मेघराज जगताप, संदीप करे, किशोर मोहिते, प्रतिक धिवार व दादा जाधव यांच्या पथकाने सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज करीत आहेत.


29
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!