By, Avishkar Fule
पुणे : पूर्ववैमनस्यातून एका महिलेच्या घराला आग लावून घरातील साहित्याचे नुकसान केल्याप्रकरणी पर्वती पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. ११) पहाटे दोनच्या सुमारास अरण्येश्वर परिसरातील तावरे कॉलनी येथे घडली.
याप्रकरणी ५३ वर्षीय महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रुपेश उर्फ भोप्या राजेंद्र खाडे (वय २४, रा. तावरे कॉलनी, अरण्येश्वर) आणि मुबारक वसीम खान (वय २५, रा. तावरे कॉलनी, अरण्येश्वर) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या घरी झोपलेल्या असताना आरोपींनी पूर्ववैमनस्यातून त्यांच्या घराला आग लावली. या घटनेत घरातील सुमारे ६५ हजार रुपयांच्या वस्तू जळून नुकसान झाले. तसेच घरासमोर उभ्या असलेल्या इतरांच्या मालकीच्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडूनही नुकसान करण्यात आले.
या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२६ (ग), ३२४ (४), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. नामदे अधिक तपास करत आहेत.









