मांगूर जातीच्या माशांची तस्करी करणारे वाहन ताब्यात; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई


By Tushar lavhe

उरूळी कांचन ता.१७ : पुणे–सोलापूर महामार्गावर बंदी असलेल्या मांगूर जातीच्या माशांची बेकायदेशीर वाहतूक करणारे पिकअप वाहन उरुळीकांचन पोलिसांनी ताब्यात घेतले असून चालकाविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (ता.१६) रात्री साडेआठच्या सुमारास सोरतापवाडी (ता. हवेली) येथील म्हसोबा मंदिरासमोर करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे–सोलापूर महामार्गावर संशयास्पदरीत्या वेगाने जाणारे एमएच ०४ एलक्यू ७६५७ क्रमांकाचे पिकअप वाहन पोलिसांनी अडवले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मांगूर जातीचे मासे आढळून आले. या माशांच्या वाहतुकीवर शासनाने बंदी घातलेली असतानाही त्यांची बेकायदेशीररीत्या वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले.

या प्रकरणी अर्षदअली महम्मदअली शेख (वय ३०, रा. संघमित्र नगर, भिवंडी, जि. ठाणे) याच्याविरोधात पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम १५, ३ व ५, भारतीय न्याय संहिता कलम २२३ तसेच अन्न सुरक्षा आणि मानके कायदा कलम ५९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस हवालदार तात्याराम अंकुश करे यांनी उरुळीकांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मांगूर जातीच्या माशांच्या सेवनामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, याची माहिती असतानाही आरोपीकडून वाहतूक सुरू असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

उरुळीकांचन पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.


20
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!