By, Avishkar Fule
पुणे, ता. १६ : ‘ड्रग्समुक्त पुणे’ अभियानांतर्गत भारती विद्यापीठ पोलिसांनी रिक्षातून गांजाची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून, ३५ किलोहून अधिक गांजा आणि दोन रिक्षांसह सुमारे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग, सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलिस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, तसेच पोलिस अंमलदार किरण साबळे, तुकाराम सुतार, मंगेश गायकवाड हे १४ मे रोजी रात्री चिंतामणी ज्ञानपीठ परिसरातील सर्व्हिस रोडवर गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, चारुदत्त काळुराम चव्हाण (वय २५, रा. गंगानगर, फुरसुंगी) हा रिक्षातून गांजा विक्रीसाठी घेऊन येणार होता. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुरुवातीला दोन किलो गांजा आणि रिक्षा जप्त करण्यात आली.
त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या तपासात आरोपीने लपवून ठेवलेला आणखी ३३ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत एकूण ३५ किलो गांजा आणि रिक्षासह सुमारे ८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपीविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासात पुणे शहरात रिक्षांमधून गांजाची वाहतूक करून विक्री करणारे रॅकेट कार्यरत असल्याचे समोर आले आहे. याच प्रकारातील आणखी एका कारवाईत दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी एका आरोपीकडून अर्धा किलो गांजा आणि रिक्षा जप्त केली होती. या दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल पाटील करत आहेत.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निर्देशानुसार आणि पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते तसेच सहायक पोलिस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे, पोलिस निरीक्षक कैलास कोडग, सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलिस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, तसेच पोलिस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, किरण साबळे, मंगेश गायकवाड, तुकाराम सुतार, अवधूत जमदाडे, सचिन सरपाले, मितेश चोरमोळे आणि निलेश खैरमोडे यांच्या पथकाने केली.









