By, Avishkar Fule
पुणे, ता. २३ : कसबा पेठ परिसरातील घरफोडी प्रकरणाचा छडा लावत फरासखाना पोलिसांनी दोन अट्टल घरफोड्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल १८ लाख ४९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि घरफोडीसाठी वापरलेली साधने जप्त करण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ मार्च २०२६ रोजी रात्री साडेआठ ते दहा वाजण्याच्या सुमारास कसबा पेठेतील पवळे चौक परिसरातील बंटी कॉर्नर इमारतीतील फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली होती. सेफ्टी दरवाजाचा कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत बेडरूममध्ये ठेवलेले सुमारे १३०.३०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ५० हजारांची रोकड असा एकूण ११ लाख ७ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे आणि पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यावेळी पोलीस हवालदार गजानन सोनुने यांनी संशयितांची ओळख पटवली. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच आरोपी दिल्ली, अयोध्या, आग्रा, झाशी, लातूर, बार्शी आणि छत्रपती संभाजीनगर परिसरात सतत ठिकाण बदलत होते.
अखेर छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चंद्रकांत उर्फ चंद्या अनंत माने (वय ३३, रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवडगाव) आणि रामा उर्फ रामजाने लक्ष्मण क्षिरसागर (वय ३३, रा. गौर, ता. कळंब, जि. धाराशिव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, दरवाजा तोडण्यासाठी वापरलेला अॅडजस्टेबल पाना आणि चोरीतील सोन्याचे दागिने असा एकूण १८ लाख ४९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे आणि पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे तसेच फरासखाना पोलिसांच्या तपास पथकातील अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.









