By, Avishkar Fule
लोणी काळभोर, ता. २४ : शेती विक्रीतून मिळालेली रक्कम गुंतवल्यास दरमहा २० टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एका महिलेची तब्बल २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार लोणी काळभोर परिसरात उघडकीस आला आहे. सुरुवातीला काही महिन्यांचा परतावा देऊन विश्वास संपादन करण्यात आला. मात्र, त्यानंतर पैसे देणे बंद केल्याने आर्थिक तणावातून फिर्यादी महिलेच्या पतीचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी पुनम प्रमोद पवार (वय ५०, सध्या रा. पिंपरी, पूर्वी रा. कुशलवाटिका सोसायटी, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अतुल शामराव पवार (रा. नांदवळ, ता. कोरेगाव, जि. सातारा) आणि संतोष सुरेश काकडे (रा. स्वप्नपूर्ती पार्क, राहींजवस्ती, लोणी काळभोर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनम पवार या ऑनलाइन पुरणपोळीच्या ऑर्डरचा व्यवसाय करतात. सन २०२० मध्ये त्यांनी आणि त्यांच्या पतीने चार एकर शेती विकून सुमारे २० लाख रुपये मिळवले होते. या रकमेची माहिती गावातील ओळखीचे असलेल्या अतुल पवार याला होती. त्यानंतर अतुल पवार व त्याच्या पत्नीने पुनम पवार यांच्या घरी जाऊन गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला.
“माझे मित्र संतोष काकडे यांचे नागार्जुन ग्रुप आणि पुणे मेट्रो कंपनीशी टायअप आहे. पैसे गुंतवल्यास दरमहा २० टक्के परतावा मिळेल,” असे सांगून गुंतवणुकीस प्रवृत्त करण्यात आले. सुरुवातीला पुनम पवार यांनी नकार दिला होता. मात्र, अतुल पवार हा वारंवार त्यांच्या घरी जात होता. तसेच त्यांच्या पतीला दारू पाजून पैसे गुंतवण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यामुळे पती-पत्नीमध्ये वादही होत होते.
अखेरीस ५ सप्टेंबर २०२० आणि १६ ऑक्टोबर २०२० रोजी प्रत्येकी १० लाख रुपये, असे एकूण २० लाख रुपये अतुल पवार यांच्या ‘वर्ल्ड ट्रेडिंग कंपनी’च्या कोटक महिंद्रा बँक खात्यावर वर्ग करण्यात आले.
सुरुवातीच्या चार महिन्यांत प्रत्येकी एक लाख रुपये परतावा देण्यात आला. त्यामुळे फिर्यादींचा विश्वास वाढला. मात्र, त्यानंतर अचानक पैसे देणे बंद करण्यात आले. पुनम पवार व त्यांचे पती पैसे मागण्यासाठी गेले असता, संतोष काकडे यांनी “तुम्ही मला पैसे दिले का? अतुल पवारकडून पैसे घ्या,” असे म्हणत त्यांना घराबाहेर हाकलून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी शिवीगाळ व मारहाणही करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेनंतर फिर्यादी महिलेचे पती मानसिक तणावाखाली गेले आणि काही काळानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुनम पवार यांनी पैसे परत मिळवण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला. मात्र, टाळाटाळ व धमक्या दिल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस करीत आहेत.









