धाराशिव आगाराच्या एसटीचा ब्रेक निकामी; चालकाच्या प्रसंगावधानाने ४० प्रवाशांचे प्राण वाचले


By, Tushar lavhe

कुरकुंभ, ता. ८ (वार्ताहर) : पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ (ता. दौंड) येथील मुक्कदमवाडी उड्डाणपुलावर धाराशिव आगाराच्या धावत्या एसटी बसचा अचानक ब्रेक निकामी झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत बस दुभाजकावर चढवून थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. या बसमधील सुमारे ४० प्रवासी सुखरूप बचावले.

धाराशिव आगाराची एमएच २० बीएल ३९१३ क्रमांकाची एसटी बस रविवारी पुण्याच्या दिशेने जात होती. मुक्कदमवाडी पुलाजवळ पोहोचताच बसचा ब्रेक अचानक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्या वेळी महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ होती. समोरील वाहनांना धडक होण्याची तसेच बसवरील नियंत्रण सुटण्याची शक्यता निर्माण झाली होती.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने कौशल्यपूर्ण निर्णय घेत बस थेट दुभाजकावर चढवून थांबविली. त्यामुळे संभाव्य भीषण अपघात टळला. बस पुलाखाली कोसळण्याचा धोका देखील टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

घटनेनंतर वाहकाने प्रवाशांना धीर देत दुसऱ्या बसची व्यवस्था केली. त्यामुळे काही वेळाने प्रवाशांचा पुढील प्रवास सुरळीत करण्यात आला.

दरम्यान, मुक्कदमवाडी उड्डाणपूल उतरल्यानंतरचा तीव्र उतार आणि धोकादायक वळण यामुळे या परिसरात वारंवार अपघात होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. विशेषतः परगावाहून येणाऱ्या वाहनचालकांना वळणाचा अंदाज न आल्याने हा भाग अपघातप्रवण ठरत आहे. एमआयडीसी परिसरातील कामगारांनाही याचा फटका बसत असून, या ठिकाणी तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.


27
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!