By, Avishkar Fule
यवत, ता. ८ : पुणे ग्रामीण पोलिस दलातील पोलिस निरीक्षक आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक स्तरावरील ३० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाच्या बैठकीनंतर पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले. प्रशासकीय कारणास्तव आणि पोलिस यंत्रणेचे कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी या बदल्या करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या बदल्यांमध्ये यवत पोलिस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक मिळाले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक संतोष वसंत तासगावकर यांची यवत पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे यवत पोलिस ठाण्याच्या नेतृत्वात बदल झाला असून स्थानिक पातळीवर या नियुक्तीकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, बारामती तालुका पोलिस ठाण्यात नियंत्रण कक्षातील नारायण विनायक पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून विद्यमान पोलिस निरीक्षक चंद्रशेखर मोहनराव यादव यांची शिक्रापूर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. तसेच बारामती विभाग वाहतूक शाखेतील निलेश पांडुरंग माने यांची भोर पोलिस ठाण्यात, तर नियंत्रण कक्षातील महेश रामचंद्र स्वामी यांची बारामती विभाग वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय जुन्नर, शिरूर, लोणावळा शहर, हवेली, दौंड, उरुळी कांचन, राजगड, सासवड, जेजुरी, भिगवण, माळेगाव आदी ठिकाणीही पोलिस निरीक्षक आणि सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या व्यापक बदल्यांमुळे पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या कामकाजात अधिक परिणामकारकता आणि समन्वय साधला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









