केडगाव गर्भपात प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करा खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


By, Tushar lavhe

केडगाव, ता. ८ (प्रतिनिधी) : दौंड तालुक्यातील केडगाव येथे उघडकीस आलेल्या गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपात प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे केली आहे.

या प्रकरणाबाबत खासदार सुळे यांनी रविवारी समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त करत तीव्र खंत व्यक्त केली. दौंड तालुक्यात गेल्या दोन वर्षांत सुमारे ५०० गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून गर्भलिंग तपासणी करून स्त्री भ्रूणहत्या करण्यात येत असल्याचे उघड झाल्याचे त्यांनी नमूद केले.

“हा प्रकार अत्यंत संतापजनक असून मानवतेला काळिमा फासणारा आहे. या घटनेमुळे समाजातील विकृत मानसिकता पुन्हा एकदा समोर आली आहे,” असे सुळे यांनी म्हटले आहे. या भागातील स्त्री-पुरुष गुणोत्तरातही लक्षणीय घट झाल्याचे निदर्शनास आले असून, हजार मुलांमागे केवळ ८२४ मुली असे प्रमाण असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

‘जागर जाणिवांचा’सारख्या मोहिमांची आवश्यकता आजही तितकीच असल्याचे या घटनेतून स्पष्ट होत असल्याचे सांगत, स्त्री-पुरुष समानतेच्या विचारांचा अधिक प्रभावीपणे प्रसार करण्याची गरज असल्याचे सुळे यांनी नमूद केले. गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूणहत्येविरोधात शासनाने विविध स्तरांवर व्यापक जनजागृती मोहीम अधिक आक्रमकपणे राबवावी, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, केडगाव येथील या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू असून, संबंधित यंत्रणांकडून तपासाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


27
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!