मोका गुन्ह्यातील फरार आरोपी चार महिन्यांनंतर जेरबंद


By, Avishkar Fule

पुणे, ता. ८ : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) अंतर्गत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील चार महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट-५ पथकाने शिताफीने अटक केली आहे.

कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपींनी फिर्यादीवर अग्निशस्त्राद्वारे हल्ला केला होता. या प्रकरणात आरोपींना अग्निशस्त्र पुरविणारा आणि हद्दपार असलेला आरोपी गणेश तुकाराम घावरे (वय २८, रा. कोंढवा, पुणे) हा फरार होता. त्याच्याविरुद्ध मोका तसेच अन्य गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल आहे.

दरम्यान, घावरे हा कोंढवा परिसरात वावरत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार राहुल ढमढेरे यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून पारशी मैदान, कोंढवा खुर्द परिसरातून त्याला ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी आरोपीला कोंढवा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांच्या सूचनेनुसार पोलीस अंमलदार राहुल ढमढेरे, शहाजी काळे, सुधीर सोनवणे आणि नासेर देशमुख यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली.


27
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!