पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; एअरबॅगमुळे नवविवाहित दाम्पत्य बचावले


By, सुनिल घनवट

मंचर, ता. ९ : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील पेठ (ता. आंबेगाव) येथे कार आणि टेम्पो यांच्यात झालेल्या समोरासमोरच्या भीषण धडकेत नवविवाहित दाम्पत्य जखमी झाले. अपघाताची तीव्रता मोठी असतानाही कारमधील एअरबॅग वेळेत उघडल्याने दोघांचे प्राण वाचल्याची माहिती मिळाली.

शनिवारी (ता. ६) रात्री झालेल्या या अपघातात माळेगाव (ता. खेड) येथील हॉटेल व्यावसायिक वैभव कातोरे आणि त्यांची पत्नी प्रिया कातोरे जखमी झाले. त्यापैकी प्रिया कातोरे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून दोघांवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिस व प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मंचरच्या दिशेने जाणारी कार आणि पेठ गावाच्या बाह्यवळण मार्गावरून महामार्गावर येणारा टेम्पो यांच्यात जोरदार धडक झाली. धडकेमुळे कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना उपचारासाठी रवाना केले. अपघाताच्या वेळी कारमधील एअरबॅग कार्यान्वित झाल्याने डोके व छातीला गंभीर दुखापत होण्याचा धोका टळल्याचे सांगण्यात आले.

विशेष म्हणजे, वैभव आणि प्रिया कातोरे यांचा अवघ्या महिनाभरापूर्वी विवाह झाला होता. जुन्नरच्या दिशेने जात असताना त्यांच्यावर हा प्रसंग ओढवला.

दरम्यान, सोमवारी (ता. ८) रात्रीपर्यंत या प्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात कोणतीही फिर्याद दाखल झालेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

एअरबॅगचे महत्त्व पुन्हा अधोरेखित

अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असले तरी एअरबॅगमुळे दोघांचे प्राण वाचले. आधुनिक वाहनांमधील सुरक्षाविषयक यंत्रणांची उपयुक्तता या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची प्रतिक्रिया पारगाव तर्फे खेड येथील रमेश सावंत पाटील यांनी व्यक्त केली.


27
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!