By, Avishkar Fule
शिक्रापूर, ता. ९ : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील रानमाळ वस्तीवर घरासमोर झोपलेल्या व्यक्तीचा अज्ञात व्यक्तीने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे घडली. या घटनेत बाळासाहेब बबन तांबे (वय ४३) यांचा मृत्यू झाला असून शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब तांबे आणि त्यांची आई हौसाबाई तांबे हे रविवारी रात्री घराबाहेर झोपले होते. बाळासाहेब घरासमोरील कट्ट्यावर तर हौसाबाई ओट्यावर झोपल्या होत्या. दरम्यान, सोमवारी पहाटे सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास मोठा आवाज झाल्याने हौसाबाई यांना जाग आली. त्यावेळी अंधारात एक व्यक्ती घटनास्थळावरून पळून जाताना दिसली. त्यानंतर त्यांनी बाळासाहेब यांच्याकडे पाहिले असता ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले.
हौसाबाई यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारील घरात झोपलेले बाळासाहेब यांचे भाऊ प्रकाश तांबे बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, त्यांच्या घराच्या दरवाज्याला बाहेरून कडी लावलेली असल्याचे आढळून आले. कडी काढल्यानंतर बाहेर आलेल्या प्रकाश तांबे यांना बाळासाहेब यांचा गळा चिरलेला असल्याचे दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख यांच्यासह शिक्रापूर पोलिसांचे पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
या प्रकरणी प्रकाश बबन तांबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशांनी तपास सुरू आहे.









