By, Avishkar Fule
पुणे : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास करत पोलिसांनी सराईत आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरीस गेलेले सुमारे ३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ४ जून २०२६ रोजी दुपारी ४.२३ ते रात्री ८.१० या कालावधीत आंबेगाव बुद्रुक येथील जगताप बिल्डिंगमधील एका बंगल्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. यावेळी घरातील सोन्याचे दागिने चोरी करून नेण्यात आले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५ व ३३१(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करताना पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व त्यांच्या पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केले. तपासादरम्यान हा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी यश ऊर्फ पांड्या संतोष कुचेकर (वय २०, रा. तळजाई माता वसाहत, पद्मावती, पुणे) याने केल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरीस गेलेले ३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी करीत आहेत.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-२) मिलिंद मोहिते व सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तसेच पोलीस अंमलदार मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, महेश बारवकर, मंगेश पवार, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, मितेश चोरमोळे आणि निलेश खैरमोडे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.









