By, सुरज जगताप
दौंड, दि. ९ : तालुक्यातील नानवीज येथे शेतकऱ्याच्या घरात घरफोडी करून चोरट्याने सुमारे ४ तोळे सोन्याचे दागिने आणि १ लाख ३५ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नानवीज येथील पाटणकर कुटुंबीय शनिवारी (दि. ६) रात्री घराला कुलूप लावून घरासमोर झोपले होते. यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातून आवाज येत असल्याचे लक्षात येताच कुटुंबीय जागे झाले. त्यावेळी एक तरुण संशयित घटनास्थळावरून पळून जाताना दिसल्याचे त्यांनी सांगितले.
चोरट्याने घरातील कपाटातून १ लाख ३५ हजार रुपयांची रोकड तसेच सुमारे ४ तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण, पोत आणि कानातील दागिने चोरून नेले. या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी बापू जिजाबा पाटणकर (वय ४९, रा. नानवीज) यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.









