By, Avishkar Fule
पुणे, प्रतिनिधी : पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत राबविण्यात आलेल्या कोंबिंग ऑपरेशनदरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट-६ ने मोठी कारवाई करत दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक केली. यामध्ये शंभरहून अधिक गुन्ह्यांची नोंद असलेल्या कुख्यात गुंडाचाही समावेश असून, त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे, धारदार शस्त्रे आणि कारसह सुमारे ६ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक १० जून २०२६ रोजी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे आणि त्यांच्या पथकाने मांजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भापकर मळा रोड, रेल्वे पुलाजवळ गस्त घालत असताना एक संशयास्पद चारचाकी वाहन उभे असल्याचे आढळले. पोलिसांनी चौकशीसाठी वाहनाजवळ जाताच त्यातील इसमांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतले, तर काही साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे अजयसिंग अर्जुनसिंग दुधानी (रा. मांजरीनगर, मांजरी बुद्रुक), रामजितसिंग रणजितसिंग टाक (रा. तुळजाभवानी वसाहत, हडपसर) आणि अभयसिंग सिकंदरसिंग जुन्नी (रा. गंगानगर, फुरसुंगी) अशी आहेत.
आरोपींची व वाहनाची झडती घेतली असता त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे, सहा धारदार शस्त्रे, दरोड्यासाठी लागणारे साहित्य आणि एक कार जप्त करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपींनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस तपासात मुख्य आरोपी अजयसिंग दुधानी याच्याविरुद्ध राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ११९ गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे उघड झाले. तसेच उर्वरित दोन्ही आरोपींवरही सहापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.
याप्रकरणी मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४), आर्म अॅक्ट कलम ३(२५), ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(२)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, पोलीस अंमलदार प्रमोद टिळेकर, तानाजी देशमुख, प्रशांत कर्णवर, बाळासाहेब सकटे, श्रीकांत पांडुळे, अमित कांबळे, अनिल जामगे, गणेश माने, उमेश शेलार आणि शेखर काटे यांनी सहभाग घेत महत्त्वाची भूमिका बजावली.
या कारवाईमुळे मोठा दरोडा आणि संभाव्य गंभीर गुन्हा घडण्यापूर्वीच रोखण्यात पोलिसांना यश आले आहे.









