सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त


By, Avishkar Fule

पुणे, दि. १० जून : डेक्कन पोलिसांच्या तपास पथकाने कारवाई करत सराईत गुन्हेगाराकडून गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले, पोलीस अंमलदार सचिन गायकवाड व सागर घाडगे हे हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार सचिन गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार डेक्कन पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील आरोपी श्रीकांत ऊर्फ सोन्या संतोष मरळ (वय ३५, रा. पर्वती दर्शन चाळ, पर्वती, पुणे) हा भिडे पुलाजवळील नदीपात्र परिसरात संशयास्पदरीत्या थांबलेला असल्याचे समजले.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून अंदाजे ५० हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल तसेच ५०० रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी हा शस्त्रसाठा जप्त केला.

या प्रकरणी पोलीस अंमलदार सचिन गायकवाड यांच्या फिर्यादीवरून डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४२/२०२६ नोंद करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), ३७(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्रीकांत ऊर्फ सोन्या मरळ याच्याविरुद्ध यापूर्वी पुणे शहर व पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांत खंडणी, मारहाण, अपहरण आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ १) पी. आर. पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सपना देवताळे, पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले, पोलीस अंमलदार सचिन गायकवाड, सागर घाडगे, वसिम सिद्दीकी, दत्तात्रय शिंदे, राजेंद्र मारणे, संजय दंडगुळे व धनश्री सुपेकर यांच्या पथकाने पार पाडली.


27
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!