By, Avishkar Fule
पुणे, दि. १० जून – चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरीस गेलेले सोने-चांदी व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा ३ लाख १ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चंदननगर परिसरात २८ मे २०२६ रोजी घरफोडीची घटना घडली होती. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ३०५(अ), ३३१(१) व ३३१(३) नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता गुन्ह्यात MH-12-NW-8247 क्रमांकाच्या ऑटो रिक्षेचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले. रिक्षामालकाकडे चौकशी केल्यानंतर ती रिक्षा शिफ्टवर चालविणाऱ्या रोहित नितीन गायकवाड (वय २८, रा. कृष्णानगर, महंमदवाडी, पुणे) याचा शोध घेण्यात आला. मोबाईल लोकेशनच्या आधारे त्याला सोलापूर येथून ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान रोहित गायकवाड याने मनीष सुजीत नागपुरे (रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे) याच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर ४ जून रोजी त्याला अटक करण्यात आली.
पुढील तपासात आरोपींनी चोरीतील सोने-चांदी महंमदवाडी व वानवडी येथील सोनारांना विकल्याचे समोर आले. पोलिसांनी सोनारांकडून १५ ग्रॅम सोने, १३०.२७ ग्रॅम चांदी तसेच गुन्ह्यात वापरलेली ऑटो रिक्षा जप्त केली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ३,०१,५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण नरवडे करीत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-७) डॉ. प्रशांत अमृतकर, सहायक पोलीस आयुक्त (खराडी विभाग) नूतन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल धस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक किरण नरवडे, तसेच तपास पथकातील पोलीस अंमलदार मेमाणे, डांगे, कदम, घावटे, घुटे, लहाणे, बेंद्रे, गायकवाड, तसेच वाहतूक विभागातील सहायक पोलीस फौजदार गणेश येळे आणि पोलीस अंमलदार लोकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.









