By, Avishkar Fule
लोणी काळभोर, ता. ११ (प्रतिनिधी) : हुंड्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करत मानसिक व शारीरिक छळ, गर्भपातासाठी दबाव तसेच सात महिन्यांच्या गर्भवती अवस्थेत माहेरी सोडून दिल्याप्रकरणी एका २३ वर्षीय विवाहितेने पतीसह सासरच्या चौघांविरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याप्रकरणी समीक्षा प्रज्योत बांगर (वय २३, सध्या रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली, मूळ रा. बांगरवस्ती, केसनंद) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रज्योत प्रकाश बांगर (पती), प्रकाश पांडुरंग बांगर (सासरे), प्राजक्ता निखील फरगडे (नणंद) आणि निखील फरगडे (नणदोबा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीक्षा आणि प्रज्योत बांगर यांचा विवाह १६ मार्च २०२४ रोजी दोन्ही कुटुंबांच्या संमतीने झाला होता. विवाहावेळी वधूपित्याने चार तोळे सोने तसेच लग्नाचा संपूर्ण खर्च केला होता. सासू आजारी असल्याने घरातील जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी विवाह लवकर करण्याचा आग्रह सासरच्या मंडळींकडून करण्यात आला होता.
लग्नानंतर सासरी गेल्यानंतर फिर्यादीला सतत टोमणे मारून अपमानित करण्यात येत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. “तुझ्या आई-वडिलांनी काही दिले नाही,” अशा शब्दांत वारंवार अवमान करण्यात येत असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.
दरम्यान, फिर्यादी गर्भवती असल्याचे समजल्यानंतर पतीसह सासरच्या मंडळींनी गर्भपात करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. त्यास नकार दिल्यानंतर माहेरहून पाच लाख रुपये आणावेत, अशी मागणी करत मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. गर्भवती असतानाही घरातील सर्व कामे करून घेत त्रास दिला जात असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सात महिन्यांची गर्भवती असताना झालेल्या वादातून नणदोबाने शिवीगाळ व मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर ११ एप्रिल २०२५ रोजी पतीने पत्नीला माहेरी सोडले. चार-पाच दिवसांत घेऊन येण्याचे आश्वासन दिले असले तरी त्यानंतर कोणतीही विचारपूस केली नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
त्यानंतर १ जुलै २०२५ रोजी विवाहितेने मुलीला जन्म दिला. मात्र, मुलीच्या जन्मानंतरही पती अथवा सासरच्या मंडळींनी भेट घेतली नाही किंवा विचारपूस केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या पीडिता आपल्या दहा महिन्यांच्या मुलीसह माहेरी राहत आहे.
कौटुंबिक वाद मिटविण्यासाठी ‘भरोसा सेल’मार्फत समुपदेशनाचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, पतीने समुपदेशनास नकार दिल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.









