By, भारत गायकवाड
कोपर्डे हवेली, ता. ११ : जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना शहापूर (ता. कऱ्हाड) येथील जवान अर्जुन राजेंद्र जाधव (वय ३०) हे हॅण्ड ग्रेनेडच्या स्फोटात हुतात्मा झाले. या दुर्दैवी घटनेमुळे शहापूरसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
अर्जुन जाधव हे गेल्या नऊ वर्षांपासून भारतीय सैन्यात कार्यरत होते. ते लष्कराच्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपचे जवान असून सध्या जम्मू-काश्मीरमधील आठ राष्ट्रीय रायफल्स (8 RR) मध्ये कार्यरत होते. त्यांची नियुक्ती उरी सेक्टरमध्ये होती.
मंगळवारी उशिरा उरी सेक्टरमधील कमलकोट भागात नियंत्रण रेषेजवळ गस्त घालत असताना भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन जवानांना वीरमरण आले असून त्यामध्ये अर्जुन जाधव यांचा समावेश आहे. अन्य जखमी जवानांना तातडीने श्रीनगर येथील बदामीबागमधील ९२ बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपचारादरम्यान अर्जुन जाधव यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेत हुतात्मा झालेले दुसरे जवान विक्रम चव्हाण हे नवी मुंबईतील ऐरोली येथील रहिवासी असल्याचे समजते. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तो भूसुरुंगामुळे झाला की अन्य कोणत्या कारणामुळे, याचा तपास लष्कराकडून सुरू आहे.
लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
हुतात्मा जवानांचे पार्थिव आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या मूळगावी पाठविण्यात येणार आहे. अर्जुन जाधव यांचे पार्थिव शुक्रवारी (ता. १२) शहापूर येथे पोहोचण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर शासकीय व लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अर्जुन यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई-वडील, भाऊ आणि बहिणी असा परिवार आहे. त्यांचा धाकटा भाऊ ऋषी जाधव हे भारतीय नौदलात कार्यरत असून सध्या सुटीवर गावी आले आहेत.
मुलाच्या पहिल्या वाढदिवसाची तयारी; पण नियतीने घातला घाला
हुतात्मा अर्जुन जाधव यांचा मुलगा सर्वेश याचा पहिला वाढदिवस २५ जून रोजी साजरा होणार होता. त्यासाठी अर्जुन यांनी विशेष तयारी केली होती. वाढदिवसाच्या निमित्ताने ते १५ जून रोजी सुटीवर घरी येणार होते. मात्र, त्याआधीच कर्तव्य बजावताना त्यांना वीरमरण आल्याने जाधव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलाच्या पहिल्या वाढदिवसाचे स्वप्न अपुरेच राहिल्याने संपूर्ण शहापूर गाव हळहळ व्यक्त करत आहे.









