अंबडच्या आठवडी बाजार परिसरात शौचालयाचा प्रश्न पेटला; लहुजी क्रांतीसेनेचा बेमुदत उपोषणाचा इशारा


By, तरंग कांबळे

अंबड, जि. जालना (प्रतिनिधी):
अंबड शहरातील आठवडी बाजार परिसरात सार्वजनिक शौचालय व मुतारीचे बांधकाम मंजूर होऊनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने लहुजी क्रांतीसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. लहुजी क्रांतीसेनेचे सेनाप्रमुख शिवराज दादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मराठवाडा अध्यक्ष तरंग लक्ष्मणराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली १४ जून २०२६ पासून अंबड नगर परिषद कार्यालयासमोर जिवंतपणी ‘प्रतीकात्मक सरण’ रचून बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

आठवडी बाजार परिसरात दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक, व्यापारी, महिला व ग्रामीण भागातील लोकांची वर्दळ असते. मात्र या परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन नगर परिषदेने १९ लाख २ हजार ४८३ रुपये खर्चाच्या १२ सीटर सार्वजनिक शौचालय व मुतारी बांधकामास प्रशासकीय मान्यता दिली होती. मात्र मंजुरी मिळून वर्षभराहून अधिक कालावधी लोटल्यानंतरही काम सुरू झाले नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

लहुजी क्रांतीसेनेने प्रशासनाकडे काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. मंजूर सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम तातडीने सुरू करावे, विलंब झालेली जुनी निविदा प्रक्रिया रद्द करून नवीन निविदा प्रक्रिया राबवावी, काम पूर्ण करण्याची निश्चित कालमर्यादा लेखी स्वरूपात द्यावी आणि बांधकाम पूर्ण होईपर्यंत नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

यासंदर्भात मराठवाडा अध्यक्ष तरंग कांबळे यांनी सांगितले की, “नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. मंजूर निधी असूनही काम रखडले आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नासाठी आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे.”

लहुजी क्रांतीसेनेचे सेनाप्रमुख शिवराज दादा जाधव यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनाची शहरात मोठी चर्चा सुरू असून, प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडूनही होत आहे. दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.


27
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!