विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून तीन वाहनचोरीचे गुन्हे उघड; २.३५ लाखांची वाहने जप्त


By, Avishkar Fule

पुणे, ता. ११ : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने धडाकेबाज कारवाई करत एका विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून वाहनचोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले असून दोन दुचाकी आणि एक रिक्षा अशी एकूण २ लाख ३५ हजार रुपयांची तीन वाहने जप्त केली आहेत.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक वाहनचोरांचा शोध घेत होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे आणि अभिनय चौधरी यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, एक विधीसंघर्षग्रस्त बालक वंडरसिटी रोड परिसरात चोरीची रिक्षा व दुचाकी घेऊन थांबला आहे.

माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून वंडरसिटी रोड ते सावंत विहार मार्गावर कारवाई केली. यावेळी संबंधित बालकाकडे एमएच १२ क्यूआर ३७८४ क्रमांकाची रिक्षा आणि एमएच १२ क्यूक्यू ७१८२ क्रमांकाची डिओ दुचाकी आढळून आली. चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने ही वाहने चोरी केल्याची कबुली दिली.

पुढील तपासात त्याने एमएच १२ केझेड ६१११ क्रमांकाची होंडा शाईन दुचाकीही चोरी केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी ती दुचाकीही जप्त केली.

 

जप्त करण्यात आलेली वाहने

* तीनचाकी रिक्षा (एमएच १२ क्यूआर ३७८४) – किंमत १ लाख रुपये

* डिओ दुचाकी (एमएच १२ क्यूक्यू ७१८२) – किंमत ६५ हजार रुपये

* होंडा शाईन (एमएच १२ केझेड ६१११) – किंमत ७० हजार रुपये

एकूण २ लाख ३५ हजार रुपयांची तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत.

ही कारवाई पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तसेच पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, अवधूत जमदाडे, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार आणि संदीप आगळे यांच्या पथकाने केली.


27
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!