नारायणगावात तंबाखू माफियांवर धाड! 4.48 लाखांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला साठा जप्त; ज्येष्ठ व्यापारी अटकेत


By, सुनिल घनवट

नारायणगाव, ता. 11 (प्रतिनिधी) : अन्न व औषध प्रशासन विभागाने नारायणगाव परिसरात मोठी धडक कारवाई करत धनगरवाडी (ता. जुन्नर) येथील गोदामावर छापा टाकून 4 लाख 48 हजार 506 रुपये किमतीचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. या प्रकरणी मारुती सीताराम शेळके (वय 66) यांना अटक करण्यात आली असून जुन्नर न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी संतोष शामराव सावंत (सह आयुक्त कार्यालय, अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ही कारवाई 9 जून रोजी दुपारी अडीच ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत करण्यात आली. छाप्यात केशरयुक्त विमल पान मसाला, व्ही-1 सुगंधित तंबाखू, रत्ना तंबाखू, हिरा पान मसाला, रॉयल 717 तंबाखू, महक चैनी फिल्टर तंबाखू तसेच आंटी गोड सुपारीसह विविध प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.

नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता पुढील तपासासाठी तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली.

दोन-तीन वर्षांपासून सुरू होता अवैध व्यवसाय?

नारायणगावातील कोल्हे मळा रस्त्यालगत दुकान आणि शिंदे मार्केट परिसरात पानमसाल्याचा व्यवसाय करणाऱ्या संबंधित व्यापाऱ्याकडून गेल्या दोन ते तीन वर्षांपासून किरकोळ विक्रेत्यांना प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा पुरवठा होत असल्याची चर्चा परिसरात होती. मात्र यापूर्वी त्यांच्यावर कोणतीही मोठी कारवाई झाली नव्हती.

अन्न व औषध प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे अवैध तंबाखू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून ग्रामस्थांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.


27
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!