कामेरीत ४८ गांजाची झाडे जप्त; दोघांना अटक, ८.८९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत


By, भारत गायकवाड

ईश्वरपूर, प्रतिनिधी : नशामुक्त सांगली अभियानांतर्गत ईश्वरपूर पोलिसांनी वाळवा तालुक्यातील कामेरी गावात धडक कारवाई करत तब्बल ४८ गांजाची झाडे जप्त केली. या कारवाईत ८ लाख ८९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून रविंद्र सदाशिव माळी (वय ४९, रा. येलूर) आणि आनंदा भिमराव चव्हाण (वय ५०) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या आदेशानुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक कामेरी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी एका व्यक्तीकडे गांजा विक्रीसाठी असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी राजमुद्रा मटका मिसळ परिसरात सापळा रचला. झाडाखाली प्लास्टिकचे पोते घेऊन बसलेल्या रविंद्र माळी याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता पोत्यात गांजाची झाडे आढळून आली. चौकशीदरम्यान ही झाडे आनंदा चव्हाण याच्या ऊस शेतातून आणल्याची कबुली त्याने दिली.

यानंतर पोलिसांनी आनंदा चव्हाण यांच्या शेतात छापा टाकला असता, तेथे ८ ते ९ फूट उंचीची व उग्र वासाची ४८ गांजाची झाडे लावलेली आढळून आली. पंचनामा करून सर्व झाडे उपटून जप्त करण्यात आली. जप्त झाडांचे एकूण वजन ४४ किलो ४५० ग्रॅम असून त्यांची किंमत सुमारे ८ लाख ८९ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी पोलीस कर्मचारी विशाल पांगे यांनी फिर्याद दिली असून, अंमली औषधी द्रव्ये व मनप्रभावी पदार्थ अधिनियम, १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक किरण दिडवाघ करत आहेत.

या कारवाईत कुबेर खोत, अमोल सावंत, दीपक घस्ते, शशिकांत शिंदे, विशाल पांगे, अरुण कानडे, विकास थोरबोले, रविंद्र बनसोडे, विजय पाटणकर, अभिजीत पाटील, अजय पाटील आणि कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने सहभाग घेतला.


27
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!