By, सुनिल घनवट
घोडेगाव, ता. १२ : आंबेगाव तालुक्यातील बोरघरजवळील कोकणेवाडी येथे कपडे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या १६ वर्षीय मुलीचा पाय घसरून पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत मुलीचे नाव अनुश्री चिंतामणी वालकोळी (वय १६) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनुश्री ही नेहमीप्रमाणे घराजवळील तलावावर कपडे धुण्यासाठी गेली होती. कपडे धूत असताना अचानक तिचा तोल जाऊन पाय घसरल्याने ती खोल पाण्यात पडली. तिला पोहता येत नसल्याने ती पाण्यात बुडू लागली. मदतीसाठी तिने आरडाओरडा केला, मात्र त्या वेळी परिसरात कोणीही नसल्याने तिला वेळेत मदत मिळू शकली नाही.
बराच वेळ होऊनही अनुश्री घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. तलावाजवळ तिचे कपडे, साबण आणि चपला आढळून आल्याने संशय बळावला. यानंतर स्थानिक ग्रामस्थ व पोलीस पाटील यांनी घोडेगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने तलावात शोधमोहीम सुरू करण्यात आली. मात्र अंधार पडल्याने ती थांबविण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. काही तासांच्या प्रयत्नांनंतर अनुश्रीचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला.
या प्रकरणी घोडेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, सहायक पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे कोकणेवाडी व परिसरात शोककळा पसरली आहे.









